उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेनंतर आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
विशेष म्हणजे या याचिकेनंतर राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठराखण करत भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाल्या?
रोहिणी खडसे यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी राज ठाकरे यांचा फोटो पोस्ट केला आहे. “कालपासून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जात आहे. पक्षाला विविध इशारा दिले जात आहेत. त्यांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे. बंधू राज साहेब, मराठी पक्षांचे, मराठी उद्योजकांचे, मराठी भाषेचे किंबहुना महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे काही पक्षांना वावगं आहे. कारण याआधीही मराठी माणसांनी बनवलेले दोन मराठी पक्ष फोडण्यात आले आहेत,” असे रोहिणी खडसे यांनी म्हटलंय. तसेच, तुम्ही एकदा तपासून घ्यावे मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही , असे म्हणत भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
उत्तर भारतीय विकास सेनेनं काय मागणी केली?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वेगवेगळ्या ठिकाणी मराठीचा वापर व्हावा अशी मागणी केली जात आहे. नुकतेच मनसेने बँकांत मराठी भाषेचा वापर करावा, ही मागणी करत आंदोलनं केली होती. असे असतानाच उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत मनसेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी केली आहे. तसेच मनसेचे कार्यकर्ते हिंदी भाषिकांवर हल्ले करतात. राज ठाकरे यांच्या भडकाऊ भाषणांमुळे हल्ले होतात, असंही या याचिकेत म्हणण्यात आलंय.