राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे.येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. त्यातच आता अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर आली आहे.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाले आहेत, त्यांच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला जात आहे. २४ तासांपासून उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबाशी संपर्क झाला नाहीये. या घटनेने अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली आहे. दोन उमेदवार गायब झालेल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी दिलीय.
केडगाव भाग हा संवेदनशील असल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठीच दोन उमेदवारांचे अपहरण केले असल्याचा संशय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केला आहे. प्रभाग क्रमांक सतरा मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे गायब झालेल्या उमेदवारांची नाव आहेत.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार गायब झालेल्या उमेदवारांपैकी एक उमेदवार हा भारतीय जनता पार्टी तर दुसरा उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभा होता. दरम्यान या प्रकरणी आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, लवकरात लवकर गायब असलेल्या उमेदवारांचा तपास करावा अशी मागणी केली आहे.
विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा म्हणाले की, मनसेचे दोन्ही उमेदवार २४ तासांपासून गायब आहेत. आम्ही पक्ष कार्यालयात तपास केला तेव्हा ते प्रचारासाठी पक्षाचे साहित्य घेऊन गेले. परंतु ते प्रचारालाही गेले नाहीत. ना घरी गेले. त्यांच्या कुटुंबीयांचे फोन आम्हाला येत आहेत. त्यांच्या मुलांचे काही बरेवाईट झालं तर जबाबदार कोण असा सवाल ते करत आहेत.