भाजपाने काल आपली पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज मनसेने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. स्वतः राज ठाकरे यांनीच ही घोषणा केली.
मनसे राज्यात सुमारे 250 जागा लढवणार आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी 7 उमेदवारांची घोषणा केली होती. आता आणखी दोन उमेदवारांची घोषणा त्यांनी केली आहे.
राजू पाटील यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे हे आज डोंबिवलीत आले होते. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी इथे भाषणासाठी आलो नसून माझ्या राजू पाटीलच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आलोय. मतदार यादीवर शेवटचा हात फिरवत आहे. आज किंवा उद्या दुसरी यादी जाहीर होईल, असे ते म्हणाले.
यानंतर राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा केली. तसेच अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना आपण 24 ऑक्टोबरला स्वतः हजर राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.
मनसेचे आतापर्यंत घोषित झालेल्या उमेदवारांची यादी :
1. बाळा नांदगावकर - शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे - पंढरपूर
3. लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे
5. चंद्रपूर - मनदीप रोडे
6. राजुरा - सचिन भोयर
7. यवतमाळ - राजू उंबरकर
8. ठाणे - अविनाश जाधव
9. कल्याण-डोंबिवली - राजू पाटील