मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकामागून एक धक्के बसत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि पक्षाच्या स्थापनेपासून सोबत असलेले माजी नगरसेवक विरेंद्र तांडेल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
विरेंद्र तांडेल यांनी आपला राजीनामा थेट राज ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. यामध्ये त्यांनी गंभीर आरोप केले आहे. स्थानिक पातळीवर काम करताना दिली जाणारी वागणूक अत्यंत अपमानास्पद आणि वेदनादायक असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
विरेंद्र तांडेल यांचे राज ठाकरेंना पत्र
प्रति,
आदरणीय श्री. राज साहेब ठाकरे,
अध्यक्ष,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना,
मुंबई.
विषय : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याबाबत.
सविनय जय महाराष्ट्र!
मा. साहेब,
मी विरेंद्र विष्णू तांडेल, प्रभाग क्रमांक १९०, माहीम, पक्षाच्या स्थापने पासून नवनिर्माण सेनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळत कार्यरत आहे. राज साहेब, आपल्या नेतृत्वाखाली मला नेहमीच मान, सन्मान व विश्वास मिळाला आहे. त्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन.
मात्र सध्या माहीम विभागातील संघटनात्मक कामकाजात ज्या प्रकारे वागणूक दिली जात आहे, ती माझ्यासाठी अत्यंत अपमानास्पद व वेदनादायक ठरत आहे.
स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये असलेली एकजूट, आपुलकी व संघभावना पूर्णपणे अभावाने दिसून येत आहे. त्यामुळे मला या संघटनेचा भाग असल्याची भावना राहिलेली नाही.
राज साहेब, आपण आम्हा सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच मान-सन्मान दिला आहे, मात्र दुर्दैवाने तो मान आणि आपली विचारधारा मूळ पातळीवरील व्यवस्थापनात प्रतिबिंबित होताना दिसत नाही. यामुळे माझ्या मनात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून, या परिस्थितीत पुढे काम करणे मला योग्य वाटत नाही.
या सर्व बाबींचा सखोल विचार करून, कोणताही कटुता न ठेवता, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सर्व पदांचा राजीनामा देत आहे, तो आपण स्वीकारावा ही विनंती.
राज साहेब, आपल्याबद्दल आणि आपल्या विचारांबद्दल माझ्या मनात सदैव आदर राहील.
जय महाराष्ट्र !