दैनिक भ्रमर : बेस्ट पतपेढी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाएकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचले. ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आल्याचं कळताच अनेक राजयकीय चर्चांना उधाण आलं आणि त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदार संजय राऊत यांनी या भेटीमागचं कारण आपल्याला ठाऊक असल्याचं म्हणत माध्यमांसमोर काही गोष्टी स्पष्ट केल्या.
संजय राऊत म्हणाले की, गणपतीचे दिवस आहेत, काही दिवसांतच घरोघरी गणपती येतील. कदाचित ते गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी गेले असतील. राज्यासंदर्भातील काही प्रश्न असतील. फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली. दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यासारखी शहरं बुडाली आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या भेटीमुळे कुणाला इतका त्रास करून घेण्याची गरज नाही.
आम्हाला त्रास झालाय का? नाही. आम्हाला माहिती आहे काय कारण आहे, असं खोचकपणे संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षातील नेते भेटत असतात. आम्ही सुद्धा अनेकदा भेटतो. त्यावर चर्चा का करायची? भेटूद्या… जे दोन नेते एकमेकांना भेटतात ते दोन नेतेच भेटण्याचं कारण सांगू शकतात असंही राऊत म्हणाले.