राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांत मंत्रालयात मोठा गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. शासकीय दुखवट्यात मंत्रालयात २० संस्थांच्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रमाणपत्र वाटपाला स्थगिती दिली होती. त्यानंतर कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर हा विभाग अजितदादांकडे होता.
राज्यात शासकीय दुखवटा असताना या शिक्षण संस्थांना मंत्रालयातून गुपचूप अल्पसंख्याक दर्जा दिला जात होता. यातही धक्कादायक बाब म्हणजे यातील पहिले प्रमाणपत्र अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या दिवशी दुपारी ३ वाजून ९ मिनिटांनी देण्यात आले.
माणिकराव कोकाटे यांनी १२ ऑक्टोबरला या प्रमाणपत्रांना स्थगिती दिली होती. मात्र असंवेदनशील अधिकाऱ्यांनी अजितदादांच्या निधनानंतर लगेचच ही प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय घेतला. हा सारा प्रकार लक्षात येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा असे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.