खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा; मिळणार २५ टक्के आरक्षण
खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा; मिळणार २५ टक्के आरक्षण
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील पोलीस अंमलदारांना आता पीएसआय होण्याचा मार्ग मोकळा झालाय. सरकारने पोलीस उपनिरीक्षक पदासाठी खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. शासनाच्या या निर्णयाने मेहनती आणि अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. दरम्यान फेब्रुवारी २०२२ मध्ये विभागीय परीक्षा बंद करण्यात आली होती. आता ही परीक्षा आता पुन्हा सुरू झालीय. 

तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कमी वयातच PSI पदावर पदोन्नती मिळेल. तसेच पोलीस दलात तरुण आणि ऊर्जावान अधिकारी दीर्घकाळापर्यंत सेवेत राहू शकतील. साधारणपणे पोलीस कॉन्स्टेबलला प्रमोशनद्वारे PSI पद मिळते. पण ते त्यांच्या सेवाकालाच्या शेवटच्या टप्प्यात मिळते.त्यामुळे त्यांना PSI म्हणून फारतर दोन-तीन वर्षेच काम करता येत असते. 

परंतु विभागीय परीक्षेतून पीएसआय झालेल्या अधिकाऱ्यांना कमी वयातच पदोन्नती मिळेल. त्यामुळे त्यांना पुढील २० ते २५ वर्षे PSI तसेच त्यापेक्षा वरिष्ठ पदांवर कार्य करण्याची संधी मिळेल. दरम्यान गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलीस खातेअंतर्गत विभागीय परीक्षा सुरू करण्याची मागणी केली होती.राज्य सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, “पोलिस दलातील मेहनती, कर्तव्यनिष्ठ आणि तरुण पोलिस अंमलदारांना अधिकारी म्हणून पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. या शासन निर्णयामुळे पोलिस दलात नवे चैतन्य निर्माण होईल.”

पूर्वी किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांना PSI पदासाठी 25 टक्के आरक्षणाच्या अंतर्गत विभागीय परीक्षा देता येत होती. या माध्यमातून अनेक मेहनती व अनुभवी पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळत होती. मात्र फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार ही परीक्षा बंद करण्यात आली होती.या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परीक्षा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर शासनाने आज अधिकृत निर्णय घेतला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group