काँग्रेस अन् MIM सोबत युती खपवून घेणार नाही, देवेंद्र फडणवीस संतापले; नेमकं प्रकरण काय ?
काँग्रेस अन् MIM सोबत युती खपवून घेणार नाही, देवेंद्र फडणवीस संतापले; नेमकं प्रकरण काय ?
img
वैष्णवी सांगळे
अकोट नगरपरिषद येथे एमआयएमसोबत तर अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेससोबत भाजपने युती केल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. भाजपच्या याच भूमिकेवरुन आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. बहुमतासाठी भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला. या अकोट विकास मंचमध्ये भाजपनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा एमआयएम, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती सहभागी झालीय. या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. 



तर सत्तेसाठी अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसची युती झाली. शिंदेंच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेस अशी हातमिळवणी झाली. एकीकडे काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या आरोळ्या भाजपचे वरिष्ठ नेते देशपातळीवर ठोकत असतात, तर दुसरीकडे नगरपरिषदेत सत्तेसाठी काहीही करण्याची भाजप नेत्यांची तयारी असल्याचं दिसतंय. याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्थानिक पातळींवर झालेल्या एमआयएम आणि काँग्रेससोबतच्या आघाडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम युती केली. तर अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज झाले. तसेच खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस आणि एमआयआएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. काँग्रेस आणि एमआयएमसोबत युती होऊच शकत नाही.  स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group