स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रचारक जाहीर,  भाजपकडून 'या' ४० स्टार प्रचारकांची नावे जाहीर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रचारक जाहीर, भाजपकडून 'या' ४० स्टार प्रचारकांची नावे जाहीर
img
वैष्णवी सांगळे
मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :- महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. निवडणूक आयोगाने स्टार प्रचारकांची मर्यादा 40 केल्याने भाजपने मुख्यमंत्री फडणवीस, गडकरींसह 40 नेत्यांची फौज जाहीर केली आहे.

निवडणूक आयोगाने स्टार प्रचारकांची मर्यादा 20 वरून 40 केल्याने भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबरला लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. अनेक ठिकाणी भाजपने मित्रपक्षांची युती न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच लागलेल्या बिहार निवडणुकीच्या निकालाने पक्षाचा आत्मविश्‍वास वाढला आहे. त्याच जोशात भाजप आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आखाड्यात उतरणार आहे.

भाजपने जाहीर केलेल्या यादीत केंद्रीय आणि राज्य पातळीवरील अनुभवी नेत्यांसह आक्रमक चेहर्‍यांना स्थान दिले आहे. याचे प्रमुख नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे असणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण हे या निवडणुकांच्या प्रचाराची मुख्य धुरा सांभाळणार आहेत.

 तसेच नितीन गडकरी, पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, तसेच राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिव प्रकाश हे केंद्रीय नेते निवडणुकीच्या प्रचारात दिसणार आहेत. तसेच चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे, गणेश नाईक, आणि जयकुमार रावल हे राजकीय नेतेही प्रचार करणार आहेत. यासोबतच नारायण राणे, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, आशिष शेलार, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, शिवेंद्रराजे भोसले आणि मेघना बोर्डीकर हे नेतेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार करताना दिसत आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर या 40 नेत्यांची फौज राज्यभर प्रचाराचा धुरळा उडवणार आहे. विशेष म्हणजे, अल्पसंख्याक समाजातील इद्रिस मुलतानी आणि माजी खासदार अमर साबळे यांच्यावरही प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये भाजपचे हे मिशन इलेक्शन किती यशस्वी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
BJP |
इतर बातम्या
Join Whatsapp Group