गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून संसदेतील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. यातच भाजपचे खासदार प्रताप सारंगी संसदेच्या पायऱ्यांवरून पडल्यानं डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यासह खासदार मुकेश राजपूत सुद्धा जखमी झाली आहेत. विरोधी पक्षनेते, राहुल गांधी यांनी धक्का दिल्याचा आरोप प्रताप सारंगी यांनी केला आहे.
भाजप खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांना रूग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर भाजपकडून राहुल गांधींवर निशाणा साधण्यात येत आहे. भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही होण्याची शक्यता आहे.
"राहुल गांधींनी माझ्यावर पडलेल्या एका खासदाराला धक्का दिला आणि त्यानंतर मी खाली पडलो, मी पायऱ्यांजवळ उभा होतो तेव्हा राहुल गांधी आले आणि एका खासदाराला धक्का दिला जो माझ्यावर पडला," असे सारंगी म्हणाले.