गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील काँग्रेसचे नेते राहुल दिवे हे भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी राहुल दिवे यांनी मौन सोडले आहे आणि मोठा खुलासा केला आहे.
माझ्या भाजपा प्रवेशाबद्दल येणारा बातम्या या अफवा असून मी काँग्रेस पक्षात आहे आणि काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे राहुल दिवे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसापासून विविध माध्यमातून मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार अशा अफवा येत आहेत. परंतु माझ्या इतर पक्षात प्रवेश होणार या सगळ्या अफवा असून मी आजही काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि यापुढेही काँग्रेस पक्षातच राहणार आहे.
मी अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचा जबाबदार राज्यस्तरावर काम करणारा प्रतिनिधी आहे. तसेच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. काँग्रेस पक्षाचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्याकरता अनेक वर्षापासून काम करतो आहे. काँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्ष विचारांशी मी जोडलेलो असल्यामुळे मी काँग्रेस पक्ष सोडून कुठल्याही पक्षांमध्ये प्रवेश करणार नाही.
येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष व संघटना मजबुती करण्याकरता मी कटिबद्ध आहे त्यामुळे माझ्या पक्षप्रवेशाबद्दल येणाऱ्या बातम्या या अफवा असून यावर कोणीही विश्वास ठेवू नये. माझ्या पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. येणाऱ्या काळामध्ये नाशिक शहरांमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मजबुतीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये यश प्राप्त करण्याकरता मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.त्यामुळे जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी दिली.
गेल्या काही वर्षापासून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना माझ्या प्रभागात माझ्या विभागात ज्या पद्धतीने माझ्या कामाचा ठसा उमटवला त्यामुळे इतर पक्षांचा आकर्षण माझ्याकडे होऊ शकतो परंतु मी कुठल्याही पक्षांमध्ये प्रवेश करणार नाही मी काँग्रेस पक्षाच्या विचारांशी कटिबद्ध आहे असेही राहुल दिवे यांनी नमूद केले.