दैनिक भ्रमर : मृत लोकांसोबत चहा पिण्याची संधी तुम्हाला मिळाली तर... आहे ना काही तरी नवीन. तुम्हाला मिळो ना मिळो पण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मात्र ही संधी मिळाली आहे. तो व्हिडीओ देखील त्यांनी समाजमाध्यमांवर टाकला आहे. आता नेमकं प्रकरण काय हे आपण समजून घेऊया.
नेमके प्रकरण काय ?
मत चोरीच्या मुद्यावर राहुल गांधी प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमध्ये कसे डुप्लिकेट मतदार घुसले आहेत हे पुराव्यानिशी दाखवले. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आता बिहारच्या मतदारयाद्यांचे तब्बल 60 लाख मतदारांना अपात्र ठरवले आहे. या एसआयआर विरोधात राहुल गांधींनी आक्रमक भूमिक घेतली आहे.
बिहारमध्ये ज्या मतदारांना मतदारयाद्यांमध्ये मृत घोषित केले आहे त्यांच्यासोबत चहा पित असतानाचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या मतदारांनी राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राहुल यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
'जीवनात खूप वेगळाच अनुभव मिळाला. मृत लोकांसोबत चहा पिण्याची संधी मिळाली. या अनुभवासाठी निवडणूक आयोगाचे धन्यवाद.', असा टोला निवडणूक आयोगाला राहुल यांनी लगावला. राहुल गांधी यांनी मतदारयादीमध्ये मृत घोषित केलेल्या नागरिकांना आश्वासित केले की ते मत चोरी होऊ देणार नाही.