काँग्रेसचे दोन बडे नेते भाजपच्या मार्गावर?  वाचा सविस्तर
काँग्रेसचे दोन बडे नेते भाजपच्या मार्गावर? वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
पुणे : लोकसभेला उत्तम परफॉर्मन्स दाखविलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित , असं यश प्राप्त झालं नाही. पाच वर्षे केंद्रात आणि राज्यातही सत्ता नसल्यामुळे काँग्रेसला गळती लागली आहे.

अशातच पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे  दोन बडे नेते  भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्या प्रवेशासाठी पूर्वीचे काँग्रेसधील आणि भाजपमध्ये जम बसविलेले मंत्री प्रयत्नशील आहेत.

पुरंदर हवेलीचे संजय जगताप आणि भोर-राजगड-मुळशीचे संग्राम थोपटे हे काँग्रेसचे माजी आमदार ‘हात’ सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी भाजप प्रवेशासाठी चाचपणी सुरू केली आहे. जगताप आणि थोपटे यांना भाजपात घेण्यासाठी जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.

पुणे जिल्ह्यात जगताप आणि थोपटेंच्या माध्यमातून काँग्रेसचे दोन आमदार 2019 मध्ये निवडून आले होते. तर, कसब्यात झालेल्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर, असे काँग्रेसचे तीन आमदार होते. पण, 2024 च्या विधानसभेला तीनही नेत्यांचा पराभव झाला आणि पुण्यातून काँग्रेस सुपडासाफ झाली.

आता जर जगताप आणि थोपटे यांनी पक्षाला ‘रामराम’ ठोकल्यास काँग्रेसची जिल्ह्यातील स्थिती बिकट होऊ शकते. परंतु, जगताप आणि थोपटेंच्या प्रवेशाला भाजपमधील स्थानिक कार्यकर्ते, नेते यांचा विरोध आहे.

पुणे हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बालेकिल्ला आहे. जगताप आणि थोपटेंना पराभवाचा सामना करावा लागल्यानं अजितदादांशी दोन हात करणे अवघड जाणार आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांचा विरोध असला, तरी जगताप आणि थोपटेंना पक्षात घेतल्यास पुण्यात काँग्रेसचा नामोनिशाण मिटू शकतो. तसेच, 2029 मध्ये भाजपने स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे अजितदादांना राजकारणात शह देण्यासाठी जगताप आणि थोपटेंचा उपयोग होऊ शकतो. त्यादृष्टीनं दोन्ही नेत्यांना पक्ष घेण्याबाबत भाजपकडून विचारमंथन सुरू आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group