जनआक्रोशाला यश ! भाजपवर चौफेर टीका होताच तुषार आपटेकडून नगरसेवक पदाचा राजीनामा
जनआक्रोशाला यश ! भाजपवर चौफेर टीका होताच तुषार आपटेकडून नगरसेवक पदाचा राजीनामा
img
वैष्णवी सांगळे
बदलापूरमधील एका प्रसिद्ध शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता. याच प्रकरणातील सहआरोपी असलेल्या तुषार आपटे याची भाजपाने स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावल्याने कालपासून संताप व्यक्त करण्यात येत होता. तसेच मनसेसह विविध संघटनांनी याविरोधात आंदोलनाची इशारा दिला होता. 

दरम्यान, या प्रकरणी भाजपाची नाचक्की झाल्यानंतर आज अखेरीस तुषार आपटे याने आपल्या पदाचा राजीनामा मुख्याधिकाऱ्यांकडे सोपवला. कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत शुक्रवारी झालेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत भाजपच्या दोन, शिवसेनेच्या दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याची निवड करण्यात आली. शुक्रवारी नवीन प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात पार पडलेल्या पहिल्या सभेत एकूण पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर झाली. 

भाजपनं बदलापूर येथील शैक्षणिक संस्थेचे सचिव तुषार आपटे यांनी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली. याबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून संताप व्यक्त झाला. विरोधकांनी भाजपला लक्ष्य केलं. शिवसेनेचे उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी यावर टीका केली होती. तर तुषार आपटे यांच्या राजीमान्यावर मनसेनं भाजपला मोर्चाचा इशारा दिला होता. जर भाजपने तुषार आपटे यांचा स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा घेतला नाही तर येत्या १३ किंवा १४ जानेवारीला मनसे बदलापूरमध्ये मोर्चा काढेल आणि आंदोलन करेल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला होता.

ऑगस्ट २०२४ मध्ये बदलापूरच्या एका नामांकित शाळेत २ चिमुरडीवर अत्याचार झाला होता. मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर, शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी हा प्रकार लपवल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. ४० दिवस फरार राहिल्यानंतर अटक झालेले आपटे सध्या जामिनावर बाहेर आहेत. जामिनावर सुटका झालेल्या आपटेला स्वीकृत नगरसेवक पदी संधी दिल्यानं भाजप वर टीका झाली. यानंतर आपटे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group