गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पक्षांतराला मोठा वेग आला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला देखील मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला.
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यास त्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या प्रशांत जगताप यांनी मोठे पाऊल उचलत शरद पवारांची साथ सोडली. राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी पक्ष सोडणार असल्याची भूमिका प्रशांत जगताप यांनी घेतली होती. त्यांनी यासंदर्भातला प्रस्ताव देखील पक्षासमोर मांडला होता. त्यानंतर नाराज झालेल्या प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे पुण्यात पालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.