राज्यातील २९ महापालिका निवडणुकांना आता केवळ काही तास शिल्लक असून उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. उद्या उमदेवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे. १६ जानेवारीला महापालिकांवर नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार हे समजणार आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात भाजपने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.बाबुराव चांदेरे यांचे नामांकन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात भाजपच्या उमेदवाराने धाव घेतली आहे. चांदेरे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपवल्याचा आरोप करत, त्यांचे नामांकन रद्द करण्यासाठी भाजपचे उमेदवार गणेश कळमकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे
गणेश कळमकर यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेनुसार, चांदेरे यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात गंभीर स्वरूपाच्या प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणांची माहिती जाणीवपूर्वक लपवून प्रशासनाची व मतदारांची दिशाभूल केल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चंदेरे यांच्यावर दोन गुन्हे प्रलंबित आहेत. या प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल झालेले असून, यातील काही गुन्ह्यांसाठी २ ते १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.