संतापजनक ! शेतकऱ्याला बुटाने मारहाण, कृषिमंत्र्यांचे पालकत्व असलेल्या जिल्ह्यात कृषी अधिकाऱ्याची दादागिरी
संतापजनक ! शेतकऱ्याला बुटाने मारहाण, कृषिमंत्र्यांचे पालकत्व असलेल्या जिल्ह्यात कृषी अधिकाऱ्याची दादागिरी
img
वैष्णवी सांगळे
संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत एका शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकाऱ्याला विचारणा केली. अनुदानाबाबत विचारल्याचा सरकारी बाबुला एवढा राग आला की या महाशयांनी थेट शेतकऱ्याला बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केली आहे. या घटनेचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाला असून ही घटना महाराष्ट्रातील कृषिमंत्र्यांचे पालकत्व असलेल्या वाशीम जिल्ह्यात घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी आपल्या तीन एकर शेतीत दोन वर्षापूर्वी मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान चार महिन्यांपासून रखडल्याचं त्यांचं म्हणण आहे. यादरम्यान, मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे गोगरी शिवारात पाहणी करण्यासाठी गेले. 

दरम्यान पवार यांनी त्यांच्याकडे रखडलेल्या अनुदानाबाबत विचारणा केली. आरोपानुसार, जाब विचारत असताना तालुका कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या अंगावर धाव घेत चक्क बुटाने मारहाण केली. याशिवाय, शेतातील मातीची ढेकळे उचलूनही पवार यांना मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्याला धमकीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'तुला गुन्ह्यात अडकवीन' अशी धमकी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी संघटनांनी केली आहे.

वाशीम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी, हिरंगी, खेर्डा बु. खुर्डा खु. येथील शेतकरी फळबाग गटापासून वंचित असल्याची तक्रार शेतकरी ऋषिकेश पवार यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे केली होती. यावेळी सादर केलेल्या निवेदनात मागील सुमारे चार महिन्यांपासून नियुक्त कृषी सहाय्यक यांच्याकडून फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मानसिक व प्रशासकीय त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद केले.

गावांतील १५ फळबाग उत्पादक शेतकरी लाभार्थ्यांचे रोजगार हमी योजनेंतर्गत गट काढण्यात आलेले नाहीत. परिणामी संबंधित शेतकरी शासनाच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. नवनियुक्त कृषी सहाय्यक रुजू झाल्यापासून फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित रहावे लागले, हे अत्यंत अन्यायकारक असल्याचा आरोप तक्रारीत केला. शेतकऱ्यांचे प्रलंबित गट तत्काळ काढून देण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून दिला.

शेतकऱ्यांच्या या पवित्र्यानंतर तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, कृषी सहाय्यक कृषी विभागाने इतर अधिकारी व कर्मचारी मंगळवारी गोगरी गावात दाखल झाले. यावेळी ते एका शेतात फळबागेची पडताळणी करून शेतकऱ्याशी चर्चा करीत होते. यावेळी ऋषिकेश पवार यांनी त्याचे चित्रिकरण केले. त्यावर तालुका कृषी अधिकारी संतापले. शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. कृषी अधिकाऱ्यांनी रागाच्या भरात पायातील बुट काढून शेतकऱ्याच्या अंगावर धावून गेले. बुटाने शेतकऱ्याला मारण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून वेगवेगळ्या स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

Washim |
इतर बातम्या
Join Whatsapp Group