पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे पूजाला अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी चौकशीही सुरू आहे. याप्रकरणी दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश आता जिल्हाधिकाऱ्यांकडून पिपंरी महापालिकेला देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या सूचनेनुसार, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयानं तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार पिंपरी पालिकेच्या वैद्यकीय विभागानं चौकशी सुरू केली आहे.
पूजा खरंच डाव्या गुडघ्यात सात टक्के कायमस्वरूपी अधू आहे का? जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार, संबंधित डॉक्टर आणि पूजाला मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे का? अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट सक्रिय आहे का? या प्रश्नांची उत्तरं डॉक्टर वाबळेंनी दिली. यावेळी वायसीएम रुग्णालयाने दिलेलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनावट नाही, असा दावा डॉक्टर वाबळेंनी केला.
एका वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार , पिंपरी वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले की, "जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आम्हाला चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आम्ही संबंधित विभागाची चौकशी करणार आहोत. या विभागांना केलेल्या तपासणीसंदर्बात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्या विभागांनी अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालाचं पुनरावलोकन करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर करणार आहोत."
"पूजा खेडकरांना देण्यात आलेलं प्रमाणपत्र सात टक्के दिव्यांग म्हणून दिलेलं आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये दोन ते चार टक्के अपंगत्व असेल तर त्यासाठी प्रमाणपत्र द्यावं लागतं. पण त्यासाठी बेंचमार्क डिसेबिलीटी ही 40 टक्क्यांची असते. ज्या व्यक्तिला 40 टक्क्यांवर अपंगत्व असेल, त्याच व्यक्तीला काही फायदे मिळू शकतात. त्यामुळे आम्हाला जो संबंधित विभागांकडून अहवाल देण्यात आला आहे, त्यामध्ये काहीही अपारदर्शकपणे झालेलं नाही, जे झालं आहे ते पूर्णपणे पारदर्शकपणे झालेलं आहे.", असंही डॉक्टर वाबळेंनी सांगितलं आहे.
पूजा खेडकरांना खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा?
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच त्यांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्यांचेही आता धाबे दणाणले आहेत. कारण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयानं वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवून देणारं रॅकेट असल्यास, ते ही उघडकीस आणावं लागणार आहे.
वायसीएम रुग्णालयानं पूजा खेडकरांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलं असून, त्यात पूजा डाव्या गुडघ्यात कायमस्वरूपी सात टक्के अधु असल्याचं म्हटलं आहे. याच प्रमाणपत्राच्या आधारे पूजानं केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्यानं या चौकशीला अधिक महत्व प्राप्त झालं आहे. कारण दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं वायसीएमच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे त्या शासकीय सेवेत रुजू झाल्यात का? अशी शंका उपस्थित केली आहे. त्याअनुषंगानं याची खात्री पटवण्यासाठी सखोल चौकशी गरजेची आहे. चौकशीत दोषी आढळल्यास अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणारे डॉक्टर, तसेच मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. तसेच, खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवून देणारं रॅकेट आहे का? हे उघडकीस आणावं. तसेच, या संपूर्ण चौकशीचा अहवाल ही जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असं या आदेशात म्हटलेलं आहे. त्यामुळं अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या डॉक्टरांसह मदत करणाऱ्या प्रत्येकाचे धाबे दणाणले आहेत.