मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी. ही घटना काल (मंगळवारी, ता ३) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मुंबई पुणे एक्सप्रेस-वे आणि जुना पुणे-मुंबई महामार्ग अशा दोन्ही मार्गांवर २० ते २२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहे.मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर प्रोपोलिन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे रोखून ठेवली आहे.
मध्यरात्रीनंतर टँकर क्रेनच्या साहाय्याने तिसऱ्या लेनवर ओढण्यात आला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक एका मार्गिकेवरून (लेन) सुरू करण्यात आली. मात्र, वाहनांचा ओघ प्रचंड असल्याने सध्या गाड्यांचा वेग अतिशय कमी आहे.या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका पहाटेच्या सुमारास प्रवास करणाऱ्यांना बसला आहे. मुंबई विमानतळावर जाण्यासाठी निघालेल्या शेकडो प्रवाशांची विमानं चुकली आहेत, ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तसेच या वाहतूक कोंडीत काही कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि इतर गंभीर आजारी रुग्ण अडकल्याची माहिती समोर आली आहे. अनेक रुग्णवाहिकांनाही वाट मिळणे कठीण झाले आहे. पाणी, अन्न व शौचालयांची सुविधाही अपुरी असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, “टोल वसूल केला जातो, पण आपत्कालीन परिस्थितीत महामार्ग इतका वेळ बंद का राहतो?” असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून महामार्ग मोकळा करावा, अशी जोरदार मागणी वाहनचालकांकडून होत आहे.