प्रशासक राज संपुष्टात ! मुंबईला अखेर महापौर मिळाला, रितू तावडे यांनी स्वीकारला पदभार
प्रशासक राज संपुष्टात ! मुंबईला अखेर महापौर मिळाला, रितू तावडे यांनी स्वीकारला पदभार
img
वैष्णवी सांगळे
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबईला आज अखेर महापौर मिळाला आहे. भाजपच्या रितू तावडे यांनी महापौरपदाची आणि शिवसेनेच्या संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रशासक राज संपुष्टात आले असून आता मुंबईत मेयर राज सुरू झालं आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. तर महायुतीने महापौरपदाचं बहुमत मिळवलं होतं. त्यामुळे भाजपचा महापौर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर भाजपने रितू तावडे यांची भाजपचे महापौरपदाचे उमेदवार म्हणून नाव घोषित केले तर शिंदे सेनेने संजय घाडी यांचे उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून नाव घोषित केले.

महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने रितू तावडे आणि संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली होती. आज त्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हातून पदभार स्वीकारला. 

या निवडीनंतर रितू तावडे या भाजपच्या मुंबईच्या दुसऱ्या महापौर ठरल्या आहेत. यापूर्वी 1982 मध्ये प्रभाकर पै हे भाजपचे मुंबईचे पहिले महापौर झाले होते. त्यानंतर रितू तावडे यांना भाजपच्या दुसऱ्या महापौर बनण्याचा मान मिळाला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या मुंबईच्या पहिल्या महिला महापौर बनण्याचा मानही तावडे यांना मिळाला आहे.

रितू तावडे या घाटकोपरच्या नगरसेविका आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणून काम पाहिलं होतं. त्यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिलं होतं.
MUMBAI |
इतर बातम्या
Join Whatsapp Group