ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मराठा बांधवांचे मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. सीएसएमटी , उच्च न्यायालय, मुंबई महानगरपालिका तसेच रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांकडून गर्दी करण्यात आली आहे. या सर्वांचा मुंबईकरांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांना येण्याजाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरून मनोज जरांगेंवर टीका केली. मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलकांवरही हाके यांनी निशाणा साधला. हाके म्हणाले, 'मनोज जरांगेंना मुंबईत येऊ देऊ नये, हेच आम्ही सांगत होतो. त्यात दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेसची लोक आहेत. असे लाड झाले तर कुणीही येईल आणि धुडगुस घालेल. मुंबईकर, महिला, पत्रकार सुरक्षित नाहीत. राज्य सरकारने जरांगे यांना धरायला हवं'.
'ज्या लोकप्रतिनिधींनी मनोज जरागेंच्या भेटी घेतल्या आहेत. त्यांनी ओबीसी आरक्षणाबद्दल भूमिका जाहीर करावी. बोगस कुणबी होऊन शिरकाव करत असेल तर ते खपवून घेणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या माणसाला महत्त्व देऊ नये. आंदोलकांना मुंबई वेठीस धरता येणार नाही. त्यांना आरक्षण देताना इतर समाजावर अन्याय होऊ नये, असेही ते म्हणाले.