ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर पाच दिवस उपोषण केले. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषणाची सांगता केली आणि उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. यामुळे एकीकडे मराठा बांधवांकडून जल्लोष करण्यात येत आहे तर दुसरीकडे ओबीसी बांधव मात्र आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता या निर्णयामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यात मराठा आरक्षणाचा जीआर फाडला आहे.
यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की, ‘हा निर्णय संविधान विरोधी आहे. हा जीआर वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयांचा अवमान करणारा आणि उल्लंघन करणारा आहे. याआधी बनावट प्रमाणपत्राद्वारे काही लोक ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत होते. त्या लोकांना आता या जीआर मुळे अभय मिळाले आहे. ओबीसींचं आरक्षण शासनाच्या संरक्षणात उद्ध्वस्त झालेलं आहे.
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत बोलताना म्हटलं की,ओबीसींच्या ताटातलं आरक्षण दिले आहे याला आमचा विरोध आहे. आज आमची बैठक आहे, या बैठकीत राज्यव्यापी आंदोलन कसं उभारायचं यावर चर्चा होणार आहे.आता आम्ही पुढची कायदेशीर लढाई कोर्टात लढणार आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.