जालना : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. ज्या जालना जिह्यातून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्याच जालन्यात आज ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा होणार आहे. जालन्यातील अंबडमध्ये ओबीसींच्या हक्कासाठी ही सभा घेण्यात येणार आहे.
दरम्यान या सभेपूर्वी या ठिकाणी अप्पर जिल्हादंडाधिकारी मनीषा दांडगे यांनी जिल्ह्यात जमाबंदीचे आदेश दिले आहे. शहरात पाच पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सभा, मोर्चे, आंदोलने करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. या आदेशाच्या भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. १७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान हा मनाई आदेश लागू राहणार आहे.
राज्यात मराठा आरक्षणावरुन मोठे आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. तसेच मराठा आरक्षण हे ओबीसई प्रवर्गातून मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला छगन भुजबळ तसेच ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. यावरून आरोप प्रत्यारोप होत आहे. जालन्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आणि हिंसक आंदोलन झाले होते. दरम्यान, आज ओबीसी संघटनातर्फे जालना येथील अंबड येथे सभेचे आयोजन केले होते. ही सभा होण्यापूर्वी मनीषा दांडगे यांनी जमाबंदीचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७(३) अन्वये हे आदेश देण्यात आले असून त्यानुसार पाच किंवा अधिक व्यक्तींना एका ठिकाणी जमण्यास मनाई करण्यात आली आहे. या सोबतच जालन्यात सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना वागळण्यात आले आहे.
दांडगे यांनी दिलेल्या आदेशानुसार या आदेशातून शासकीय कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच आसपास पाच पेक्षा अधिक नागरिकांनी जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच शस्त्रे, लाठ्या, बंदुके, तलवारी, भाले, चाकू व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तु बाळगन्यास देखील मनाई केली आहे. दगड किंवा इतर उपकरणे किंवा शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही तसेच ती जवळ देखील बाळगता येणार नाही. जमाव बंदीचा हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू राहणार आहे. आज सकाळी ७ पासून ते 30 नोव्हेंबर रात्री १२ पर्यन्त हा जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
पाच प्रमुख मार्गांवर बदल
शहागड - अंबडमार्गे जालन्याकडे येणारी वाहतूक वडीगोद्री समोरील उड्डाणपूल, शहागड, पाचोड - किनगाव चौफुलीमार्गे जालन्याकडे जाणार.
जालना- अंबडमार्गे शहागडकडे येणारी वाहतूक जालना - गोलापांगरी - पारनेर फाटा, किनगाव चौफुली-जामखेड फाटा मार्गे पाचोड- वडीगोद्री - शहागडकडे जाईल. घनसावंगी- अंबडमार्गे जालन्याकडे येणारी वाहतूक सूतगिरणी चौफुलीमार्गे राणी उंचेगाव- जालनाकडे जाईल.
पाचोड - अंबडमार्गे जालन्याकडे येणारी वाहतूक जामखेड फाटा - किनगाव चौफुलीमार्गे जालन्याकडे येईल.
पाचोड - अंबड घनसावंगी जाणारी वाहतूक पाचोड - वडीगोद्री-शहागड - तीर्थपुरीमार्गे घनसावंगीकडे जाणार आहे.
ही वाहतूक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 7 वाजेपर्यंत अथवा जनसमुदाय जाईपर्यंत राहणार आहे.
पोलिसांकडून तगडा बंदोबस्त...
अंबड येथील सभेच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. यासाठी, स्थानिक पोलिसांसह इतर जिल्ह्यातून देखील पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला आहे. सभेसाठी येणाऱ्या प्रमुख मार्गांवर पोलिसांचा बंदोबस्त असेल, तसेच सभेच्या ठिकाणी देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलनाच्या वेळी जालना शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटना पाहता, पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.