मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत उतरले आहे. मराठा आरक्षणासाठी २३ ऑगस्ट रोजी मुंबईत पोहचण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून भरुन दिले जात नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकार आमचे ऐकत नसेल तर पहिल्या पेक्षा पाच पट जास्त लोक मुंबईला जातील असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
मागच्या पंधरा दिवसात नोंदी सापडलेले आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिल्या जात नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. हे सगळे जर ऐकत नसतील तर पहिल्यापेक्षा 29 ऑगस्टला पाच पट जास्त लोक मुंबईला जातील असा दावाही मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी केला.आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील फोन करून सांगितलेले आहे की तुमच्याकडे गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा मांडायचा आहे. एकदा जर मी 29 ऑगस्टला आंतरवाली सोडली तर मागे सरकणार नाही असाही इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
ज्याला आपण निवडून पुढे पाठवले. तोच आपल्या आरक्षणाबद्दल बोलत नाही. आता म्हणून आम्हीच आता मरु पण विजयच घेऊन येऊ, तसा मोकळ्या हाताने माघारी येणार नाही असा निर्धार जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. मराठ्यांना मी आता एकच आव्हान करतो की मतभेद आणि मनभेद असतील तर ते सोडून द्या, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी फक्त दोनच दिवस मुंबईला या असे आवाहनही मराठ्यांना जरांगे पाटील यांनी केले आहे.
मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर यांना सळो की पळो करतो असे सांगून ते पुढे म्हणाले की ज्या दिवशी आंतरवालीत राज्यव्यापी बैठक झाली, त्या दिवशी जागा सुद्धा पुरली नाही. आता मुंबईत लोक कसे येतील हे फक्त फडणवीस साहेबांनी बघावं. 29 ऑगस्टच्या आत तुम्ही आरक्षण देऊन टाका अन्यथा परिस्थिती हाता बाहेर जाईल त्यास जबाबदार तुम्ही राहाल असा इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.