मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाच्या मागण्यासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र, काही मराठा आंदोलक हे आझाद मैदान सोडून चक्क मुंबई महापालिकेच्या समोर येऊन ठिय्या आंदोलन करत आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या असून राज्यातील मराठा समाजातील पात्र लोकांना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने काढला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.