मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर मोठे आंदोलन केले. या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले होते. यावेळी आझाद मैदान, सीएसएमटी सह रस्त्यावर ते थांबले. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
सलग ५ दिवस चाललेल्या या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विजय झाला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बहुतांश मागण्या मान्य झाल्यानंतर मंगळवारी आपले आमरण उपोषण मागे घेतले. त्यानंतर मुंबईत आलेले हजारो मराठा आंदोलक हे पुन्हा माघारी परतण्यास सुरुवात झाली. मात्र, या आंदोलनादरम्यान मुंबई शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप केला जात आहे.
आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांवर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील झोन १ च्या हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत एकूण ९ गुन्हे दाखल आहेत.
यामध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात ३, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात २ तर जे. जे. मार्ग, कुलाबा, एम.आर.ए. मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये बेकायदेशीर जमाव जमवणे, दमदाटी करणे यांसारखे आरोप ठेवण्यात आले आहेत.