मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. दरम्यान या प्रकरणावर सर्वच स्थरातून जोरदार टीका करण्यात आली. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील जोरदार टीका केली असून सरकारला मोठा इशारा दिला आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच आपली ही मागणी मान्य झाली नाही तर राज्य बंद असं समजयाचं, असा मोठा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना दिला आहे. “आम्ही न्यायाच्या बाजूने आहोत, या राज्यात आज चित्र-विचित्र बघण्याची वेळ आली आहे. वाईट चित्र पाहण्याची वेळ मंत्री धनंजय मुंडेंच्या टोळीने आणली आहे. लोक आता सोडून द्या म्हणून आरोपीच्या बाजूने उभे राहणार. त्यांनी पाप झाकण्यासाठी वाईट वळण लावलं आहे. खंडणी आणि हत्येतील आरोपी एकच आहेत”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.