आजकाल अनेक गंभीर आणि भयंकर असे आजार उध्दभवताना दिसत आहेत. दरम्यान आता अशाच एक गंभीर आजाराने एका कुटुंबावर काळजीच सावंत निर्माण केलं आहे. एकाच कुटुंबातील तीन मुलांना अचानक लुळेपणा आला असल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली आहे. फुलंब्री तालुक्यातील मौजे खंमाटवस्ती, पाथ्री येथे ३० महिने, ९ वर्षे आणि ११ वर्षे वयाच्या ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली असून, पोलिओ किंवा ‘गुलेन-बॅरे सिंड्रोम’ (GBS) सारख्या गंभीर आजाराची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १२ जुलै रोजी गावातील एका ९ वर्षांच्या मुलाला अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा आला. त्याची प्रकृती खालावत गेल्याने त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर अवघ्या चार दिवसांनी म्हणजेच १६ जुलै रोजी गावातील ११ वर्षांच्या मुलालाही अशीच लक्षणे जाणवू लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी १७ जुलै रोजी ३० महिन्यांच्या एका चिमुकल्यालाही अशाच प्रकारचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तिन्ही बालकांमध्ये सारखीच लक्षणे दिसत होती. विशेष म्हणजे हे तिघेही परस्परांचे नातेवाईक असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या या ९ आणि ११ वर्षांच्या मुलांवर इंटेंसिव्ह केअर युनिट (PICU) मध्ये उपचार सुरू आहेत. तर ३० महिन्यांच्या बालकावर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तात्काळ पावले उचलली आहेत. वडोदबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या खंबाटवस्ती, पाथ्री येथे मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण केले जात आहे. आरोग्य पथकाने गावातील इतर कोणत्याही व्यक्तीला अशी लक्षणे आहेत का, याचा शोध घेतला. मात्र सध्या तरी या तीन मुलांव्यतिरिक्त कोणीही रुग्ण आढळलेला नाही.
याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणेचे नळ तात्पुरते बंद केले आहेत. ग्रामस्थांना हे पाणी पिण्यासाठी वापरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या गावात शुद्ध आणि निर्जंतुक केलेले पाणी पुरवले जात आहे. जेणेकरून पाण्यामुळे जर काही आजार होत असेल तर ते टाळता येऊ शकतात.
तसेच, आरोग्य विभागाने या तिन्ही बालकांच्या स्थितीची ‘अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस’ (AFP) संशयित रुग्ण म्हणून नोंद केली आहे. AFP ही एक वैद्यकीय स्थिती आहे जी पोलिओ, गुलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) आणि इतर काही आजारांमध्ये दिसून येते. ज्यामुळे स्नायूंमध्ये अचानक कमकुवतपणा आणि लुळेपणा येतो. यामुळे ही लक्षणे पाहून पोलिओ किंवा GBS ची शक्यता अधिक गडद झाली आहे.
सध्या, या तिन्ही मुलांचे स्टूल नमुने तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) येथे पाठवण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले की, ‘AFP’ ची अनेक कारणे असू शकतात. NIV च्या तपासणी अहवालानंतरच या आजाराचे नेमके कारण स्पष्ट होईल. हा अहवाल आल्यानंतरच पुढील उपचार पद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना निश्चित केल्या जातील. या गंभीर घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे. सध्या पुढील तपासणी अहवालाची आणि आरोग्य विभागाच्या उपाययोजनांची सर्वांना प्रतीक्षा आहे.