महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून महिला कुठेही सुरक्षित नाही. अक्षरशः लहान बाळ असो किंवा वयस्कर स्त्री, कोणतीही स्त्री ही सुरक्षित नाही. दरम्यान आता अशीच एक धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे. एका नराधमाने चार महिन्याच्या बाळावर लैंगिक अत्याचार केला असल्याची संतापजनक घडली आहे.
दरम्यान, चार महिन्याच्या बाळावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधमाला धाराशिव न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.न्यायालयाने इतर साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे हा निकाल दिला आहे. धर्मराज मारुती कचरे असं दोषी आरोपीचं नाव आहे.
धाराशिव जिल्ह्यातील एका गावातील 4 महिन्याच्या बाळावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी येडशी येथील 50 वर्षीय नराधम आरोपी धर्मराज मारुती कचरे यास धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारच्या वतीने सरकारी वकील अॅड सचिन सूर्यवंशी यांनी बाजू मांडली. सुनावणी दरम्यान समोर आलेले पुरावे व युक्तिवाद ऐकून कोर्टाने आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.
बाळाच्या आईने रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात 9 साक्षीदार तपासण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी तपास करुन पुरावे गोळा केले व कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. वैद्यकीय पुरावे, मुलीच्या आईचा जबाब व प्रत्यक्षदर्शी पुरावे यात महत्वाचे ठरले. आरोपी विरोधात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात 2019 साली बाललैंगिक अत्याचार व अनुसूचित जाती अत्याचार अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.पैरवी अधिकारी म्हणू महिला पोहेक कोठावळे यांनी काम पाहिले.
जवळपास 90 टक्क्यांपेक्षा जास्त वेळेला बालकांचं लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्ती विश्वासातल्या, ओळखीच्या, जवळच्या नात्यातल्या व रक्ताच्या नात्याच्याही असतात. फार कमी वेळा त्या अनोळखी असतात. लैंगिक शोषण करणारी व्यक्ती वेगळी ओळखू येत नाही; कारण ती आपल्यातलीच, आजूबाजूला वावरणारी, विश्वासातली असते; त्यामुळं असं काही घडत असेल, अशी शंकाही मनाला शिवत नाही. या ओळखीच्या, जवळच्या नात्यातल्या व्यक्ती बालकांच्या विश्वासाचा, अज्ञानाचा गैरफायदा घेतात.