राजकीय घडामोडींना वेग आला असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार रोहित पवार यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी रोहित पवार यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यानंतर आणि त्याला अटक करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला. जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर पोलिस स्टेशनमध्ये गेलेल्या रोहित पवार यांच्या संयमाचा बांध फुटून त्यांनी पोलिसांना याविषयी जाब विचारला. रोहित पवार आणि पोलिसांमध्ये यावेळी तू तू मैं मैं झाली. यानंतर रविवारी पोलिसांनी रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मरीन ड्राईन पोलीस ठाण्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरलही झाला होता. यामध्ये रोहित पवार हे पोलिसांना हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा, असं म्हणत पोलिसांवरच भडकले होते.
जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी अटक केली. या अटकेनंतर, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघे आमदार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात देशमुख यांच्या अटकेची चौकशी करण्यासाठी पोहोचले होते. तिथे रोहित पवार यांची एका पोलीस अधिकाऱ्याशी बाचाबाची झाली.