मनमाडमध्ये डमरे कॉलनीत धाडसी चोरी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...
मनमाडमध्ये डमरे कॉलनीत धाडसी चोरी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...
img
दैनिक भ्रमर
मनमाड : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून मनमाड शहरात सुरू असलेल्या चोरीच्या सत्रात आणखी एका घटनेची भर पडली आहे. शहरातील कॅम्प विभागातील डमरे कॉलनी येथील एका बंद घराचे खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारच्या मध्यरात्री घडली. विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरात या परिसरातील ही चौथी चोरी असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डंबरे कॉलनीत राहणारे मुर्तुजा रस्सीवाला हे काही दिवसांपासून बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे खिडकी तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे व पलंग उघडून सर्व सामान अस्ताव्यस्त करण्यात आले आणि त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करण्यात आली. चोरी गेलेल्या वस्तूंचा व रकमेचा नेमका तपशील मिळालेला नसून ती माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

शहरात या चोरीबाबत चर्चेला उधाण आले असून चोरी गेलेल्या दागिन्यांची व रोख रकमेची रक्कम मोठी असल्याची शक्यता नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत मनमाड पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती.

चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ञ यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून, पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

दरम्यान सततच्या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून परिसरात गस्त वाढवावी तसेच चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group