मंत्र देण्याच्या नावाखाली ज्योतिषाचा मोठा कांड ! तरुणीला एकांतात बोलावून केलं संतापजनक कृत्य
मंत्र देण्याच्या नावाखाली ज्योतिषाचा मोठा कांड ! तरुणीला एकांतात बोलावून केलं संतापजनक कृत्य
img
नंदिनी मोरे
आजकाल फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असून पैशासाठी भामटे कोणत्या थराला जातील याचा काही नेमच नाही . त्या अंधश्रद्धा आणि देवाधर्माच्या नावाखाली अनेक भोंदू आपले काळे कारनामे करत असतात असाच  एक  धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात एका भोंदू ज्योतिषाने तरुणीला एकांतात बोलावून तिच्यावर विनयभंगाचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ज्योतिषाला अटक केली असून, त्याच्या या कृत्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 पत्रिका पाहून भविष्य वर्तवण्याचा दावा करणाऱ्या एका तथाकथित ज्योतिषाला एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भावासाठी एक 'वस्तू' देण्याच्या बहाण्याने तरुणीला एकट्याने बोलावून, तिने विरोध करताच तिला मिठी मारून 'किस' करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या ज्योतिषावर आहे. महिलेला आरोपीचा डाव लक्षात आल्यावर पळ काढला.

अखिलेश लक्ष्मण राजगुरु (वय ४५, रा. श्री स्वामी समर्थ ज्योतिष ऑफिस, राजधानी अपार्टमेंट, शंकर महाराज मठाजवळ, सातारा रोड, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या या ज्योतिषाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक तक्रारी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे, परंतु भीतीपोटी कोणीही पुढे येत नसल्याचा पोलिसांचा संशय आहे.

याप्रकरणी लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून ही तरुणी तिच्या मोठ्या भावाची पत्रिका घेऊन १२ जुलै २०२५ रोजी या ज्योतिषाच्या कार्यालयात गेली होती. पत्रिका पाहिल्यानंतर ज्योतिषाने 'तुमच्या भावाला एक वनस्पती द्यायची आहे, तुम्ही शनिवारी या' असे सांगितले.

काही वेळाने अखिलेश राजगुरु याच्या व्हॉट्सॲपवर तरुणीला मेसेज आला की, 'तुमची वस्तू आली आहे, तुम्ही एकट्याच या.' त्यावर तरुणीने 'मी मावस बहिणीसोबत येते' असे उत्तर दिले. परंतु ज्योतिषाने पुन्हा मेसेज करून 'बहिणीला शंकर महाराज मठात पाठवा, तुम्ही एकट्याच या' असे सांगितले. यावर तरुणीने 'मी वस्तू घ्यायला नंतर येते' असा मेसेज पाठवला.

१८ जुलै रोजी अखिलेशने पुन्हा व्हॉट्सॲपवर मेसेज करून 'उद्या सकाळी १० वाजता तुमची वस्तू घ्यायला या' असे सांगितले. त्यानुसार, १९ जुलै रोजी फिर्यादी तरुणी कॉलेजवरून थेट त्याच्या कार्यालयात गेली. त्यावेळी कार्यालयात कोणीही नव्हते. ज्योतिषाने तिला कार्यालयातील पडद्याच्या मागे बोलावले आणि सांगितले की, 'तुमच्या डोक्यावर वस्तू ठेवून काही मंत्र बोलावे लागतील.'

यावर तरुणीला संशय आला आणि तिने 'मला ती वस्तू नको, मी नंतर येते' असे सांगून ती उठली. ती कार्यालयातून बाहेर पडत असतानाच अचानक अखिलेश राजगुरुने तिला मिठी मारली आणि 'किस' करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला ढकलून घाबरून बाहेर पळ काढला. तिने लगेच आपल्या मावस भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.

सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या कार्यालयावर छापा टाकून त्याला अटक केली. कार्यालयाची पाहणी केल्यानंतर त्याने अशाच प्रकारचे कृत्य इतर महिलांसोबतही केले असण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे. आरोपीला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group