मालेगाव : शहरामध्ये एका व्यावसायिकाने गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले असून याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा मालेगाव मध्ये खळबळ उडाली आहे.
मागील पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यातील डोंगराळे परिसरामध्ये झालेल्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर उद्रेक झालेला होता. मागील आठवड्यातच थेट न्यायालयावर जमावणे हल्ला केल्याची घटना घडली होती हे सर्व ताजे असताना पुन्हा एकदा अत्याचाराची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दीपक छाजेड (वय ६०) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. १३ वर्षीय पीडित मुलगी ही त्याच्याकडे घर कामाला असणाऱ्या महिलेची मुलगी आहे. ती गतिमंद आहे. मंगळवारी दुपारी आईबरोबर ती व्यावसायिकाच्या घरी गेली होती. घराच्या परिसरात ती खेळत असताना संशयीताने फूस लावून तिला दुचाकीवर बसवून वैद्य हॉस्पिटल परिसरातील निर्जनस्थळी नेले. याच ठिकाणी त्याने पीडितेवर अत्याचार केल्याचा संशय आहे.
एका अल्पवयीन मुलीला वाहनावर बसवून हा व्यावसायिक घेऊन गेल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांना संशय आल्यानंतर या प्रकरणाचा बोभाटा झाला. पीडितेच्या वडिलांनी यासंदर्भात छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीताला तत्काळ अटक करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयात उभे केले असता संशयीताला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याचे सरकारी वकील संजय सोनवणे यांनी सांगितले.