छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आई वडिलांना त्यांच्या शून्य वाटणाऱ्या चुकीचे मुलांवर किती गंभीर परिणाम होतात हेच या घटनेतून दिसून येत. आई-वडिलांच्या सततच्या भांडणामुळे चक्क दोन भावंडे घरातून पळून गेले. पळून जाण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. या सख्ख्या भावंडांना शोधण्यात पोलिसांना साडेचार महिन्यांनंतर यश मिळाले आहे.
गंगापूर तालुक्यातील एका गावात राहत असलेल्या एका कुटुंबातील १६ वर्षीय मोठा मुलगा आर्यन (नाव बदललेले आहे) हा जवळच्या गावातील एका शाळेत दहावीमध्ये शिकतो, तर दुसरा १३ वर्षीय मुलगा साहिल (नाव बदललेले आहे) हा दुसऱ्या शाळेत सातव्या इयत्तेत शिकतो. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ते शाळेतून घरी परतलेच नाहीत. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी मुलं हरवल्याची तक्रार गंगापूर ठाण्यात दिली होती.
मुलांचा शोध घेताना कुटुंबीयांना घरातील टेबलावर 'आम्हाला शोधू नका, आम्ही परत येणार नाही', असे लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. शोध घेऊनही गंगापूर पोलिसांना मुलांचा शोध लागत नव्हता.दरम्यान, या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या सपोनि. सरला गाडेकर यांना खबऱ्यामार्फत लहान मुलगा हा अहिल्यानगर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील दहिगाव येथे जाऊन त्या मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशीअंती मोठा भाऊ मुंबईत असल्याचे त्याने सांगितले. यावरून पथकाने मुंबईतील मच्छी बंदर, कुलाबा येथून दुसऱ्या मुलालादेखील बुधवारी (दि.28) शोधून ताब्यात घेतले.
पोलिसांनी दोन्ही मुलांची विचारपूस केली असता, आई-वडिलांमध्ये सतत वाद होत होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी घर सोडून पलायन केल्याचे सांगितले. पथकाने दोन्ही मुलांना गंगापूर पोलिसांच्या मदतीने पालकांच्या स्वाधीन केले. पण या घटनेनं कुटुंबातील वातावरणाचे मुलांवर कसे परिणाम होतात , मुलांच्या कोवळ्या मनावर घरातील वातावरणाचे किती गंभीर परिणाम होतात , हे दिसून येते.