संभाजीनगर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या पदयात्रेदरम्यान वैजापूरमध्ये प्रचंड गोंधळ आणि राडा झाला. जलील यांच्यासमोरच कार्यकर्त्यांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याचं पहायला मिळालं.
इम्तियाज जलील हे पक्षाच्या प्रचारासाठी आणि जनसंपर्कासाठी वैजापूर दौऱ्यावर होते. पदयात्रेला सुरुवात होत असतानाच, एमआयएममधील एका गटाने जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली तसेच काळे झेंडे देखील दाखवले. ही नाराजी काही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून किंवा उमेदवारीवरून असल्याचे सांगितले जात आहे. काळे झेंडे दाखवल्यानंतर पदयात्रेतील समर्थक आणि नाराज कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची सुरू झाली.
पाहता पाहता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. इम्तियाज जलील यांच्या डोळ्यादेखतच कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले आणि लाथाबुक्क्यांनी हाणामारी सुरू झाली. यामुळे पदयात्रेत मोठी धावपळ उडाली. गर्दी आणि गोंधळ वाढतच गेल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर कार्यकर्त्यांना पांगवण्यात आले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.