छत्रपती संभाजीनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागात एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. कोणतीही जाहिरात, अधिकृत भरती प्रक्रिया किंवा परीक्षा न घेता, फक्त स्कॅन आणि मॉफ करून बनवलेल्या सह्यांचा आधार घेत 31 जणांना शासकीय सेवेत भरती केल्याचा प्रकार समोर आला आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , हा घोटाळा गेल्या दहा वर्षांत, वरिष्ठ लिपिक आणि एक बडतर्फ कनिष्ठ लिपिक यांच्या संगनमताने केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
छत्रपती संभाजीनगरसह नांदेड, जालना आणि लातूर येथील सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग विभागांमध्ये 2015 ते 2025 या काळात शिपाई, चौकीदार, सफाई कर्मचारी यांसारख्या पदांवर तब्बल 31 जणांची भरती करण्यात आली होती.
मात्र या भरती प्रक्रियेचा कोणताही अधिकृत पुरावा विभागाकडे नसल्याचं समोर आलं.
या सर्व नियुक्त्या वरिष्ठ लिपिक आणि एक बडतर्फ कनिष्ठ लिपिक यांच्या संगनमताने झाल्याचा आरोप आहे. त्यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या स्कॅन केलेल्या सह्यांचा वापर करून बनावट नियुक्तीपत्र तयार केली आणि त्याद्वारे उमेदवारांना शासकीय सेवेत रुजू करून घेतले.
याप्रकरणात आर्थिक उलाढालीचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर बनावट भरती करताना उमेदवारांकडून लाखो रुपयांची लाच घेतली गेल्याचा आरोप चौकशीतून समोर आला आहे.
या प्रकरणामुळे शासकीय यंत्रणांच्या भरती प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विभागाच्या निष्काळजीपणामुळे आणि काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या लबाडीमुळे 31 जण बेकायदेशीरपणे सरकारी सेवेत रुजू झाले. आता या सर्व भरती रद्द होण्याची शक्यता असून दोषींवर कठोर कारवाई केली जाण्याची मागणी जोर धरू लागली आहे.