नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- “नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे आणि ही ओळख अधिक मजबूत करण्याचे काम नाशिकरोड पोलीस सातत्याने करत आहेत.
स्वतःशीच स्पर्धा करत एकापेक्षा एक गुन्ह्यांची उकल होत आहे,” असे प्रतिपादन पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी केले. खोटे आरसी बुक व बनावट नंबर प्लेटच्या आधारे चोरीच्या मोटारसायकल विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल नाशिकरोड पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शहरातून मोटारसायकल चोरी करून त्या वाहनांवर खोटे आरसी बुक व बनावट नंबर प्लेट लावून विक्री करणाऱ्या टोळीचा नाशिकरोड पोलिसांनी पर्दाफाश केला असून या कारवाईत तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे ४५ लाख रुपये किमतीच्या एकूण ५२ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे शोध पथकाचे विशेष कौतुक केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश दीपक डावरे (३०, रा. पुष्पक अपार्टमेंट, मंगलमुर्ती नगर, जेल रोड, नाशिकरोड), जावेद इस्माईल शेख (२४, रा. न्यू स्टेशन वाडी, चंद्रमणी नगर, देवळाली कॅम्प) व मुस्तफा मोहम्मद शेख (२२, रा. सात आळी, बुचडी ग्राउंडजवळ, देवळाली कॅम्प) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नाशिकरोड न्यायालयाबाहेरील पार्किंगमधून १ जानेवारी रोजी लतिफ गुलाब शेख यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल चोरीस गेल्यानंतर या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाचे हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हे संशयित आंतरजिल्हा पातळीवर मोटारसायकल चोरी करून त्यावर बनावट आरसी बुक व खोट्या नंबर प्लेट तयार करून विक्री करत असल्याचे उघड झाले.
८ जानेवारी रोजी हे संशयित सिन्नर फाटा येथील सिटी लिंक बस डेपो परिसरात चोरीच्या मोटारसायकल विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रविण सूर्यवंशी व गुन्हे शोध पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन दुचाकी व चार बनावट आरसी बुक जप्त करण्यात आली. चौकशीतून नाशिक आयुक्तालय व जिल्ह्याबाहेरील एकूण ५२ चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या.
चोरी केलेल्या दुचाकी निर्जन ठिकाणी डंप करून ठेवणे, त्यावर बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करणे, ही आरोपींची ठराविक कार्यपद्धत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे व हवालदार विशाल पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त संगिता निकम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.