अजित पवार यांचे अकाली निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की हा पूर्वनियोजित कट होता यावर अनेक चर्चा राज्यात रंगत आहे. बड्या नेत्यांकडून देखील या विमान अपघातावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. सध्याच्या घडीला राज्यात अजित पवारांच्या विमान अपघाताचा विषय जसा चर्चेचा विषय आहे तसाच आणखीन एक विषय म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाचा. अजित पवार हे राष्टवादी विलीनीकरणासाठी आग्रही होते त्या संदर्भात बैठक झाला होत्या आणि १२ फेब्रुवारीला घोषणा देखील होणार होती असा गौफ्यस्फोट राष्ट्रवादीकडून ( शरदचंद्र पवार गट ) करण्यात आला. मात्र असा स्वरूपाची कुठलीही चर्चा झाली नाही असे राष्ट्रवादीकडून ( अजित पवार गट) सांगण्यात येत आहे.
अजीत पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा कोणाकडे जाणार? दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का? यावर प्रचंड चर्चा सुरू आहे.दिवंगत नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थी कलशाचे विविध जिल्ह्यात दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला येथेही मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांकडून अजित पवारांना आदरांजली वाहण्यात आली. तत्पूर्वी छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर भाष्य केलं.
छगन भुजबळ काय म्हणाले ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत अशी अनेकांची इच्छा आहे. ठाकरे एकत्र आले मग पवारही यावेत. परंतु, अशा काही चर्चा झाल्या की नाही याची कल्पना नाही. मुख्यमत्र्यांनीही सांगितलं की त्यांच्याशी अजित पवारांनी यासंदर्भात काहीही सांगितलं नव्हतं. तसंच, आम्हालाही याची कल्पना नाही. हे सर्व करायचं म्हणजे भाजपाबरोबर राहून करायचं आहे, त्यामुळे त्यांना विचारलं पाहिजे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भाजपाच्या ज्येष्ठ मंडळींनाही विचारावं लागेल. दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाबाबत काय बोलणं झालं, कोणाबरोबर बोलणं झालं हे माझ्यासहित कोणालाही माहित नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विचारावंल लागेल, कारण आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहोत. सरकारमधून बाहेर पडायचं असेल तर भाग वेगळा”, असंही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, कोणाचा स्वार्थ आहे आणि कोणाचा नाही हे जनता ठरवेल. सुनेत्रा ताईंचा शपथविधी झाला, अनेकांनी टीकेची सूर लावले. पण सुनेत्रा पवारांना विचारूनच हा कार्यक्रम झाला. त्यांच्याशिवाय कोणतंही नाव चर्चेत नव्हतं. सुनेत्रा पवारांनी संमती दिली, विधानमंडळ आणि आमदारांची परवानगी होती. मुख्यमंत्र्यांनी याबाबत राज्यपालांना सांगितलं. हे दोन ते तीन घट महत्त्वाचे आहेत. या सर्वांनी एकसुराने होकार दिला, त्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम झाला, असंही छगन भुजबळ म्हणाले.