नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- पिस्तूल चा धाक दाखवून एका युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करून एक चार चाकी गाडी फोडून परिसरात दहशत माजवल्याची घटना लेखानगर परिसरात काल रात्री घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी विशाल जाधव हे आपल्या मित्रांसमवेत काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास लेखानगर परिसरातील इंदिरा गांधी झोपडपट्टीजवळ उभे होते. त्यावेळी तीन दुचाकी गाड्यांवर संशयित हर्षद पाटणकरसह नऊ जण जाधव यांच्याजवळ आले. तुषार कापसे कुठे आहे अशी या टोळीतील एकाने जाधव यांना विचारणा केली. जाधव यांनी मला माहित नाही, असे सांगताच टोळीतील काही जणांनी जाधव यांना मारहाण केली व एकाने त्यांच्या कपाळाला पिस्तूल लावत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जाधव यांनी त्याला धक्का देत तिथून ते पळून गेले. तुषार कापसे हा तुरुंगात असून कापसे आणि पाटणकर टोळीमध्ये यापूर्वी जुने वैमनस्य होते. यातूनच ही घटना घडल्याचे समजते. जाधव तिथून पळून गेल्याने टोळीने रागाच्या भरात तिथे असलेली एक गाडी फोडून तिचे नुकसान करून परिसरात दहशत निर्माण केली.
टोळीतील तीन ते चार जणांकडे धारदार शस्त्र होते आणि तिघांकडे पिस्तूल होती. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाची चक्रे फिरवून आज पहाटे एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीवरून हर्षद पाटणकर व त्याच्या टोळी विरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन खैरनार करीत आहेत.