नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) — देवळाली गावात पहाटे साडेतीनच्या सुमारास तीन चोरट्यांनी आधी मस्जिद परिसरात उभ्या असलेल्या रिक्षांच्या डिक्कीची तोडफोड करून त्यातील हत्यारे (पान्हे) काढली व त्याच हत्यारांचा वापर करून दोन मंदिरांमध्ये चोरी करत दानपेट्या फोडल्या. तसेच सार्वजनिक पारावर असलेल्या श्री गणपती मंदिरातील सुमारे एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट लंपास केल्याची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी असल्याने रात्री व पहाटेच्या सुमारास नागरिक घराबाहेर पडत नाहीत. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी हा धाडसी प्रकार केल्याचे स्पष्ट होत आहे. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी प्रथम मस्जिद परिसरात उभ्या असलेल्या दोन रिक्षांच्या डिक्की फोडल्या. त्यामधील हत्यारे (पान्हे) काढून त्यांचा वापर करून त्यांनी पुढे मंदिरांमध्ये चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
यानंतर चोरट्यांनी देवळाली गावातील मुख्य चौकात असलेल्या पंच कमिटीच्या श्री गणपती मंदिराच्या जाळीचे दार तोडून मंदिरात प्रवेश केला. यावेळी श्री गणपतीच्या मूर्तीवरील सुमारे एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरून नेण्यात आला. तसेच मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कमही लांबवण्यात आली.
यानंतर चोरट्यांनी दांड्या मारुती मंदिर गाठून तेथील दानपेटी फोडून त्यातील पैसे चोरले. चोरीनंतर परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने रिक्षांची तोडफोड केल्याचेही समोर आले आहे.
या संपूर्ण घटनेदरम्यान परिसरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हे तीन चोरटे कैद झाले असल्याची माहिती आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या लक्षात मंदिरात चोरी झाल्याचे आले. त्यांनी तत्काळ देवळाली गाव पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दुपारपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
विशेष म्हणजे, यापूर्वीही या मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या असून वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंदिर परिसरात कायमस्वरूपी पोलिस गस्त वाढवावी तसेच सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.