शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने लाँग मार्च काढण्यात आला होता. विविध मागण्यांसाठी शेतकरी आंदोलनाला आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भव्य राज्यव्यापी लाँग मार्च नाशिक येथून मुंबईच्या दिशेने सुरु करण्यात आला होता.
या लाँग मार्चला स्थगिती मिळाली असून शेतकऱ्यांचे लाल वादळ मुंबईच्या वेशीवरून परत माघारी वळले आहे. वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करावी, समुद्राला वाहून जाणारे पाणी स्थानिकांसाठी तसेच महाराष्ट्रातल्या कोरडवाहू भागासाठी वापरावे, पेसा भरती सुरू करून रोजगार उपलब्ध करावा, आदि मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काढलेल्या लाँग मार्चच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वर्षा या निवासस्थानी मंगळवारी सकारात्मक चर्चा झाली होती.
हा मोर्चा काल मुंबईच्या सीमेवर भातसा नगर फाटा येथे येऊन धडकला होता. हजारो शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून व शासन स्तरावर विविध खात्याच्या मंत्री यांच्या बैठकीतील चर्चेअंती मार्ग निघाला आहे. हजारो आंदोलक शेतकऱ्यांना त्यांच्या गावी परतण्याची सोय मंत्री महाजन यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आले. शिवाय तीन महिन्याची मुदत मागण्यात आली आहे.