नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरी मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करणार्या कर्मचार्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या उपप्रबंधक (विधी) शिवांगी चंद्रा यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यात म्हटले, की आरोपी दीपककुमार रामपाल सिंग (रा. चौधरान सिसौली, जि. मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश) याने नाशिकरोडच्या भारत प्रतिभूती मुद्रणालय (आयएसपी) येथे कनिष्ठ कार्यालय सहाय्यक या पदाची नोकरी मिळविण्यासाठी शैक्षणिक कागदपत्रे सादर केली. या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करणार्याकरिता आयएसपीच्या वतीने साबरमती विद्यापीठ, अहमदाबाद, गुजरात (पूर्वीचे नाव कॅलॉरक्स बंसवतग) शिक्षण विश्वविद्यालय, गुजरात यांच्याकडे पाठविले होते. त्यानुसार साबरमती विद्यापीठाकडून आयएसपी प्रशासनाला अहवाल प्राप्त झाला आहे.
या अहवालानुसार आरोपी दीपककुमार सिंग याने बॅचेलर ऑफ आर्ट्सचे प्रमाणपत्र ज्याचे वर्षनिहाय गुणपत्रिका, त्याचा शैक्षणिक कालावधी 2011-2014 उत्तीर्ण वर्ष 2014 प्रमाणपत्र हे बनावट कागदपत्र सादर करून भारत प्रतिभूती मुद्रणालयात कनिष्ठ कार्यालय सहाय्यक या पदाची नोकरी मिळविली. ही नोकरी मिळवून आरोपी सिंग याने आयएसपीची फसवणूक केली असून, आर्थिक नुकसान केले आहे.
हा प्रकार दि. 31 मार्च 2018 ते 20 जानेवारी 2026 या कालावधीत घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दीपककुमार सिंग याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक अहिरे करीत आहेत.