शुक्रवारी नाशिकमधील वाडीव-हे पोलीस ठाणे हद्दीतील सारूळ गावालगतच्या आठवा मैल परिसरात शुक्रवारी (दि.२०) दुपारी रस्त्यापासून आत सुमारे एक किलोमीटर अंतरावर शेतजमिनीवर तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृत तरुणीचे वय अंदाजे २५ वर्षे होते, तसेच तिची ओळख पटलेली नव्हती. अखेर या हत्येचा उलगडा झाला असून, तिची ओळख पटली आहे. आरोपी आणि मृत तरुणी दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील असून हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी कसा लावला छडा ?
मृतदेहाजवळ पोलिसांना एक चावी आणि त्याला लावलेले की-चेन आढळले. की-चेनवर “संस्कृती” असे नाव होते. या छोट्याशा धाग्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. राज्यात ‘संस्कृती’ नावाची कोणती मुलगी बेपत्ता आहे का, याची माहिती गोळा करण्यात आली. तपासादरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील येथील संस्कृती सतीश काळे ही मुलगी बेपत्ता असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिच्या वडिलांशी संपर्क साधल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली.
तपास पुढे नेताना संस्कृतीच्या ओळखीतील देशमुख कुटुंबातील अथर्व देशमुख याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. त्याचा शोध घेतला असता तो सिन्नर, कोपरगाव आणि नाशिक शहर परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी अथर्व देशमुख आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत अथर्वने अखेर खुनाची कबुली दिली.संस्कृती आणि अथर्वचे प्रेम संबंध होते. मात्र तिला दुसऱ्या मुलासोबत पाहिल्याने त्याला राग अनावर झाला. त्यातूनच त्याने खुन केल्याची समोर आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, ही हत्या इतकी क्रूर होती की संस्कृतीच्या गळ्यात चाकू अडकलेला होता. तर तोंडात पिझ्झाचा अर्धवट तुकडा आढळला होता. अथर्व नाशिकमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेतो, तर संस्कृती अकोला जिल्ह्यात शिक्षण घेत होती. महाविद्यालयाला सुट्टी असल्याने अथर्व बुलढाण्यात घरी गेला होता. त्याने मित्रासोबत फिरायला जाण्याचे कारण सांगत संस्कृतीला कारमध्ये बसवले. दरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच त्याने गाडीतच तिच्यावर चाकूने वार करून खून केल्याचे समोर आले.खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे सुचत नसल्याने आरोपीने नाशिककडे धाव घेतली. त्याने मृतदेह वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात टाकून दिला.