होळी, धुलिवंदनाच्या सणामुळे सलग सुट्ट्या असल्याने त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी बघायला मिळत आहे. या गर्दीला नियंत्रित करतांना तेथील सुरक्षा रक्षकांसह प्रशासनाची दमछाक होत आहे. अशातच काल (रविवारी) त्र्यंबकेश्वर मंदिरात एका भाविकाला सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय.
या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सुरक्षा रक्षकांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण करण्यात आली. सुरक्षारक्षकाने मंदिरामध्येच कपडे फाटेपर्यंत भाविकाला मारहाण केल्याचं व्हिडिओमध्ये देखील दिसत आहे. यावर भाविकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
सलग सुट्ट्या आल्यानं त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. भाविकांना देवाच्या दर्शनाची प्रतीक्षा असताना लाथाबुक्क्यांचा प्रसाद मिळत असल्याची आता चर्चा होऊ लागली आहे.