नाशिकमधील वासनांध भोंदू बाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. महिलांवर अत्याचार करत असलेल्या या बाबाचे अनेक राजकीय भक्त होते त्यामुळे या प्रकरणाने संपूर्ण राज्यालाच हादरा बसला आहे.खरात याचे बड्या नेत्यांसोबतचे अनेक फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. रुपाली चाकणकर या प्रकरणी टीकेच्या केंद्रस्थानी राहिल्या दरम्यान चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रवादीचे अनेक नेते, तसेच एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, याच्यासोबत देखील खरातच फोटो समोर आले आहे.याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री भोंदू बाबाच्या सल्ल्याने काम करतात, कारभार करतात. भोंदू बाबांचा वापर करून, अंधश्रद्धा वापरून हे लोक आपला विभाग चालवतात. नासिकच्या त्या बाबाला अटक झाली, ते महाशय अनेक काळ मंत्र्यांना सल्ले देत होते. मंत्रालयातील बढत्या, बदल्या, यात त्या बाबाचा त्या मंत्र्यांच्या माध्यमातून हस्तक्षेप होता. दीपक केसरकर हे शिक्षणमंत्री असताना शिक्षण खात्याच्या अनेक बदल्या, बढत्या करण्यास हे बाबा करायला लावत होते, भाग पाडत. ट्रायडंट हॉटेल मध्ये बसून हे सगळ करायचे. शिक्षण खातं, हे खरात बाबा चालवायचा असा आरोप राऊत यांनी केला.
अशा पद्धतीने राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री काम करत असतील, त्याला कोणी हिंदुत्व मानत असतील तर त्यांना आमचा साष्टांग नमस्कार आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली. रुपाली चाकणकर म्हणजे, हिमनगाचं टोक आहे, इतर 9 मंत्री आहेत. खरात सारखा, एक बाबा गेला पण अनेक इतर बाबा हे बाकी आहेत, असं राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हे आधुनिकवादी विचार सरणीचे भक्त आहेत. ते सावरकर यांचे भक्त आहेत, ते विज्ञानवादी होते. भोंदू बाबाच्या ठिकाणी फडणवीस यांचं सरकार उठवण्यासाठी विधी करण्यात आले आणि मग या धाडी पडल्या. अंधश्रद्धेच्या माध्यमातून हे विधी केले जात होते, असा आरोप राऊत यांनी केला. या भोंदूबाबांच्या मंत्र्यांना फडणवीस यांनी बाहेरचा रास्ता दाखवला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे जर पक्षाचे नेते असतील, त्यांचा जर अंधश्रद्धेवर विश्वास नसेल तर रुपाली चाकणकरांपाठोपाठी त्यांनी ताबडतोब या मंत्र्यांचा (केसरकर) राजीनामा घेतला पाहिजे. शिंदे गटाचे जे जे मंत्री अशा कृत्यात सहभागी आहेत, त्यांच्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मोठ्या माशांवर कारवाई कधी होणार हे सांगा, असा सवाल विचारत केसरकर यांचा राजीनामा एकनाथ शिंदे यांच्या गटाने घेतला पाहिजे या मागणीचा राऊतांनी पुनरुच्चार केला.