नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातची वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सखोल चौकशी सुरू आहे. याच प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान ,अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कथित 'भोंदू बाबा' अशोक खरात याच्याशी संबंधित एका आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चाकणकर यांना समन्स बजावले आहे. या समन्सनुसार त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात उपस्थित राहून आपला जबाब नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अशोक खरात याच्यावर लोकांची फसवणूक केल्याचे आणि बेकायदेशीर मार्गाने मोठी संपत्ती गोळा केल्याचे गंभीर आरोप आहेत. खरात याने अध्यात्माच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलीस आणि तपास यंत्रणांनी त्याच्यावर कारवाई सुरू केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले असून, ईडी या प्रकरणातील 'मनी लाँड्रिंग' पैलूचा तपास करत आहे.