मालेगाव - नमाज पठणावरून मनपा आयुक्त यांनी अधीक्षक अभियंता पवार यांना शुक्रवारी निलंबित केले आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून यावर अजून काही कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मालेगाव महानगरपालिकेमध्ये सातत्याने वाद सुरू आहे. पंधरा दिवसांमध्ये उपमहापौर यांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावण्यावरून वाद झाला होता त्यानंतर किरीट सोमय्या यांना मुस्लिम महिलांनी मालेगाव मध्ये येण्यासाठी विरोध केला होता हे सर्व सुरू असताना मालेगाव महानगरपालिकेच्या अधीक्षक अभियंता कार्यालयामध्ये नमाज पठण करण्यात आले होते.
हे नागरिक प्रभागात पथदीप सुरू नसल्याबद्दल वारंवार तक्रारी करून देखील मनपा विद्युत विभागातर्फे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त नागरिकांनी विद्युत अधीक्षक अभिजीत पवार यांना जाब विचारत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमबाजी केली होती. यावेळी पवार बैठकीस निघून गेल्याने आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी नमाजाची वेळ झाल्यामुळे विद्युत अधीक्षकांच्या कार्यालयातच नमाज पठण केले होते. नमाज पठणाचा हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. हिंदुत्वादी संघटनांतर्फे नमाजास प्रतिउत्तर म्हणून आयुक्तांच्या दालनात हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले होते.
महानगरपालिका कार्यालयात नमाज पठण केले गेल्याच्या घटनेची गंभीर दखल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेत या घटनेचा निषेध करत शासकीय कार्यालयात नमाज पठण करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करावे तसेच महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील अधिकारी सेवकांवर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे होती.
दरम्यान, महानगरपालिका कार्यालयात झालेल्या नमाज पठणाची गंभीर दखल आयुक्त रवींद्र जाधव यांनी घेतली होती. आयुक्तांच्या आदेशावरून विद्युत विभागाच्या सेवकाने दाखल केलेल्या फिर्यादीवरून किल्ला पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्यासह विविध कारणांवरून मनपा विद्युत अधीक्षक अभियंता अभिजीत पवार यांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्त जाधव यांनी काढले आहे.
महानगरपालिकेने आज शुक्रवारी विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंताना निलंबित केल्याचे आदेश दिले आहेत यामुळे अजूनही या प्रकरणांमध्ये काही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.