नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कन्स्ट्रक्शन्सच्या कामाकरिता गुंतवणूक केलेल्या रकमेवर वार्षिक 21 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून 30 लाख रुपये स्वीकारून परतावा न देता फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी कारडा कन्स्ट्रक्शन्सचे संचालक नरेश कारडा यांनी फिर्यादी दिनेश सुंदर दातवाणी (रा. गोविंदा हाईट्स, आनंदनगर, उपनगर, ह. मु. जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) यांना कारडा कन्स्ट्रक्शन्स या कंपनीच्या कन्स्ट्रक्शन्सच्या कामाकरिता गुंतवणुकीच्या रकमेवर वार्षिक 21 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून दि. 2 ते 8 जून 2020 या कालावधीत फिर्यादीकडून 30 लाख रुपये गुंतवणूक म्हणून स्वीकारले.
दि. 22 एप्रिल 2022 रोजी फिर्यादीस गुंतवणूक व परतावा न देता त्याऐवजी मोबदला म्हणून फिर्यादीला नाशिकरोड येथील अनुराधा थिएटरच्या जागेवर प्रस्तावित बांधकाम करणार असल्याचे सांगून त्या बांधकामातील शॉप नंबर 10 (1200 चौरस मीटर) देण्याचे पुन्हा एकदा आमिष दाखविले. त्याबाबत शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपरवर एमओयू तयार करून याबाबत फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
त्यानंतरही ठरल्याप्रमाणे फिर्यादीला गुंतवणूक व परताव्याची रक्कम किंवा अनुुराधा थिएटर येथील जागेवर प्रस्तावित बांधकामातील शॉप हे फिर्यादीला अद्यापपर्यंत न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार दि. 2 जून 2020 ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नाशिकरोड येथील कारडा कन्स्ट्रक्शन्सच्या कार्यालयात घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नरेश कारडा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.