नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शारीरिक संबंधांचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार करणार्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही अंबड परिसरात राहते. आरोपी हर्षल मधुकर माळी (रा. नाशिक) याने फिर्यादीला त्याच्या राहत्या घरी नेले. तेथे नेऊन “तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव. नाही तर मी तुझ्या नावाने फाशी घेईन,” असे म्हणत तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले.
“हा प्रकार कोणाला सांगितलास, तर तुला मारून टाकीन,” अशी धमकी दिली. त्यावेळी पीडितेचे वय 16 वर्षे 8 महिने 26 दिवस होते. त्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत आरोपी माळी याने फिर्यादीस त्याच्या घरी बोलावून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पीडितेने आरोपीशी बोलणे बंद केले होते.
पीडिता ही 2025 मध्ये पुणे येथे पुढील शिक्षणाकरिता गेली होती. त्यावेळी माळी याने पीडिता व तिच्या आईवडिलांना फोन करून आत्महत्या करीन व पीडितेचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करीन, अशी धमकी दिली होती. आरोपी माळी याच्याकडून वेळोवेळी होणार्या त्रासाला कंटाळून पीडितेने भूमाता फाऊंडेशनशी संपर्क साधून झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली.
फाऊंडेशनसोबत पुणे शहरातील नर्हे पोलीस ठाण्यात अत्याचाराबाबतची तक्रार दिली. त्यानुसार ही तक्रार सीसीटीएनएसवर ऑनलाईन प्राप्त झाल्याने आरोपी हर्षल माळी याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..