पुणे येथे एका २१ वर्षीय तरुणीचे भररस्त्यात अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली. भिगवण येथील २१ वर्षीय तरुणीच्या अपहरण प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. भरदिवसा आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी फेकून झालेल्या या अपहरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाची माहिती लागली आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासा असा की, अपहरण करणारा मुख्य आरोपी हा पीडित तरुणीचा 'शेजारीच' असून गेल्या महिनाभरापासून ते एकमेकांच्या संपर्कात होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण झालेली मुलगी आणि ज्याच्यावर अपहरणाचा आरोप आहे त्या तरुणामधे मागील दिड महिन्यात अकरा वेळा संपर्क झाला आहे. यातील तीन वेळा अपहरणाचा आरोप असलेल्या मुलाने मुलीला फोन केला असून आठ वेळा मुलीने मुलाला एसएमएस केले आहेत. आरोपी मुलाने केलेले हे फोन मध्यरात्री उशीरा केलेले आहेत. या तीन कॉलचे ड्युरेशन अवघे तीन ते पाच सेकंद इतकेच आहे. ते दोघे फोनवरती मेसेजवरती बोलत होते, त्यामुळे आता या घटनेत विविध तर्क वितर्क लावले जात आहे, त्या तरूणीचं अपहरण झालं की प्रेमप्रकरण होतं, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.
याबाबत भिगवण पोलिस ठाण्याचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी माहिती देताना सांगितलं की, किडनॅपिंगची केस आमच्याकडे आली आहे, या अनुषंगाने किडनॅपिंग आणि जबरी चोरी अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत. जहीर शेख आणि अयान शेख या दोन सख्ख्या भावांचा या घटनेमध्ये समावेश आहे.
यामध्ये जे पीडित आहे ते आणि आरोपी या दोघांनी एकमेकांना फोन आणि टेक्स्ट मेसेज केल्याचंही समोर आलं आहे. हे सर्व तपासामध्ये आढळलं आहे, त्या अनुषंगाने काल घटनेनंतर आम्ही चार टीम रवाना केल्या होत्या, सर्वांचे फोन अद्यापही बंद आहेत आणि आमच्या टीम ज्या रवाना झाले आहेत, त्या सीसीटीव्हीच्या अनुषंगाने तपास करत आहेत. मी सर्व संघटनांना आवाहन करतो की, कोणत्याही पद्धतीच्या अफवांना बळी पडू नये, बेकायदेशीर किंवा चुकीच्या गोष्टी कोणीही करू नये. पोलीस तपास करत आहेत. यामध्ये जे काही सत्य आहे ते उजेडात येईल. त्यामुळे सर्वांनी शांतता राखावी पोलीस प्रशासन तपास करत आहे.